Shikrapur kendur Crime : जमिनीवरून असलेला वाद विकोपाला गेल्याची घटना पुण्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर येथे उघडकीस आली आहे. या वादात भावाने दुसऱ्या भावाला कारचा बोनेटवर तब्बल ५०० मीटर फरफट नेत ठार मारण्याच्या देखील प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक भावावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली.
राजेंद्र्र नाथु शिटे (वय ४६, रा. शिक्रापूर) यांनी या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी भाऊ विनायक सदाशिव थिटे, वैशाली विनायक थिटे, गणेश सदाशिव थिटे, सारीका गणेश थिटे, अमित सदाशिव थिटे, कोमल अमित थिटे, सदाशिव बुधाजी थिटे, मधुरा गणेश थिटे, अथर्व विनायक थिटे (सर्व रा. थिटेआळी, केंदूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे भाऊ शेजारी शेजारी राहतात. या जागेवरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून चुलत भावाने मारुती इस्टींगाने भावाला धडक दिली. यावेळी त्याने कारचे बोनेट पकडले. त्याच अवस्थेत कारचालक भावाने दुसऱ्या भावाला बोनेटवरुन तब्बल ५०० मीटर फरफट नेले. यामध्ये राजेंद्र थिटे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शिक्रापूरमधील साई अॅक्सिडेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची केंदूर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. फिर्यादीच्या वाट्याला आलेल्या जमिनीमध्ये त्यांचे जुने घर असून त्यांनी गेल्या ८ ते ९ महिन्यापूर्वी त्यांचे जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरु केले. त्यांच्या घरातील वीज मीटर त्यांच्या वाटणीमधील जांभळाचे झाडाला त्यांनी लावले होते. मात्र, त्याचा चुलत भाऊ विनायक थिटे याने या मीटरजवळ खेटून पत्रा ठोकून हे मीटर दिसून नये, या साठी दूसरा पत्रा लावला.
१ नोव्हेबर रोजी फिर्यादी त्याच्या कुटुंबियांसह नवीन बांधकाम पाहण्यासाठी गावी गेले असतांना त्यांना ही बाब दिसली. यावेळी त्यांनी त्यांच्या मीटर जवळ असलेला पत्रा हा दुसरीकडे नेला. त्यावेळी मीटर जवळ असलेल्या पत्र्याला त्यांचा धक्का लागला. या कारणाने चुलत भाऊ विनायक व त्याच्या घरातील सर्व जण आरडाओरडा करत फिर्यादीच्या अंगावर धावून आले. ही जागा आमची आहे म्हणत तुम्ही पत्रा का हलवला याच जाब त्यांनी फिर्यादीला विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीची पत्नी त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडल्या असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. तर फिर्यादी यांचा मुलगा आकाशला देखील त्यांनी मरण केली. फिर्यादीच्या मुलीने या घटनेचे मोबाइलवर व्हिडिओ शुटिंग केले. ते पाहून विनायक थिटे याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्यांना दगडी फेकून मारू लागले. यावेळी आरोपी विनायक थिटेने त्याची कार ही फिर्यादीच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी यांनी गाडीचे बोनेट पकडले. त्याच अवस्थेत आरोपीने भरधाव गाडी चालवत फिर्यादीला ५०० मीटर पर्यंत फरफट नेले. यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. आरोपीने काही अंतरावर गाडी नेत थांबवली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांची सुटका करून घेतली. यानंतर दवाखान्यात जाऊन उपचार घेतल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.