gadchiroli news: गडचिरोली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भवांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐवढेच नाही रुग्णवाहिका नसल्याने या मुलांना कडेवर घेऊन जातांना या दोन्ही मुलांनी जीव सोडला. तब्बल १५ किमी चालत जाऊन आई वडिलांनी दवाखाना गाठला. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. दोन्ही चिमूकल्यांनी प्राण सोडले होते. ही घटना बुधवारी अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे घडली असून या आई वडिलांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
बाजीराव रमेश वेलादी (वय ६ ) व दिनेश रमेश वेलादी (३ वर्ष ६ महीने दोघे रा. येर्रागड्डा ता. अहेरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नवे आहेत. पत्तीगाव या त्यांच्या आजोळी हे दोघे जण गेले होते. बुधवारी बाजीरावला ताप आला त्यानंतर दिनेशलाही ताप भरला. मुले आजारी पडल्याने आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. त्याने दोघांना जडीबुटी दिली. ही जडीबुटी खाल्याने त्यांची प्रकृती आणखी बिघडली. सकाळी १०.३० वाजता बाजीरावने या तापामुळे प्राण सोडले. तर दुपारी १२ वाजता दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावात रुग्णवाहिका येऊ शकली नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना कडेवर घेऊन आई- वडिलांना अवघड घाट रस्त्यातून वाट तुडवत दवाखाना गाठवा लागला. पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने वेलादी पत्नीने मोठा टाहो फोडला. दोघांनी जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात जात मुलांना दाखवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात देखील रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका आणू अशी तयारी आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखवली. मात्र, गरीब पालकांनी ही मदत नाकारत दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेत पत्तीगावची वाट धरली.
या बाबत गडचिरोलीचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे म्हणाले, या दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती नाही. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. त्या ठिकाणी त्याला जडी बुटी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना आरोग्य केंद्रात आणले. मात्र, त्यांच्या उपचार करण्यापूर्वीच मृत्यु झाला होता. आम्ही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.