राज्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार, पक्षचिन्ह निकाल ठरवणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार, पक्षचिन्ह निकाल ठरवणार

राज्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार, पक्षचिन्ह निकाल ठरवणार

Nov 13, 2024 10:46 AM IST

Maharashtra Vidhansabha Election : राज्यात निवडणूक रणधुमाळी रंगात आली आहे. मात्र, या निवडणुकीत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण एकाच नावाचे अनेक उमेदवार एकाच मतदारसंघात उभे असून मतदेतांना पक्षचिन्हाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

राज्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार, पक्षचिन्ह निकाल ठरवणार
राज्यातील ५५ विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे अनेक उमेदवार, पक्षचिन्ह निकाल ठरवणार (HT)

Maharashtra Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. प्रचारासाठी आता काही मोजकेच दिवस राहिले आहेत. त्यामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्यातील तब्बल ५५ मतदारसंघातील उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण या मतदार संघतात एकाच नावाची अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.  याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. मतदारांचा या दुहेरी नावांमुळे संभ्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षचिन्ह व निवडणूक निशाणी निकाल ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

राज्यात २८८ मतदारसंघात निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. १७ तारखेला प्रचाराची सांगता होणार आहे. राज्यातील ५५ मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करण्यात आले आहे. या माध्यमातून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. हा प्रकार रायगडमध्ये करण्यात आला होता त्यानंतर आता राज्यातील ५५ मतदारसंघात आता हा पॅटर्न दिसून आला आहे. त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य हे पक्षचिन्ह किंवा निवडणूक निशाणी ठरवणार आहे.

रायगड जिल्ह्यापासून सुरुवात

आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मत देण्यासाठी त्याच्या नाव साधर्म्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक रिंगणात उभे करण्याची सुरुवात १९९० पासून करण्यात आली. या माध्यमातून मतांची विभागणी करणे हा प्रमुख उद्देश होता. २००४मध्ये देखील अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षी पाटील या प्रमुख उमेदवार होत्या. तर त्यांच्या नावाच्या आणखी ६ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उबया होत्या. याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला झाला होता. त्यामुळे मतांचे विभाजन करण्यासाठी हा पॅटर्न राबवला जाऊ लागला.

या प्रमुख मतदार संघात आहेत एकाच नावाचे अनेक उमेदवार

इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर याच मतदार संघातून जयंत पाटील नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील देखील या मतदार संघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या नाव सारखे असलेले दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. अलिबाग मतदारसंघात देखील एकनाथ शिंदे गटाचा महेंद्र दळवी या उभ्या असून त्यांच्या नावासारखे या ठिकाणी तीन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. कर्जतमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेंद्र थोरवे यांच्या नावाचे काही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर उरणमध्ये मनोहर भोईर यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर. पाटील हे निवडणूक लढवत असून त्यांनच्या नावाचे तीन उमेदवार उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर नगर जिह्यातील कर्जत-जामखेडमध्ये भाजपकडून राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत असून या मतदार संघात राम शिंदे नावाचे दोन, तर रोहित पवार नावाचा एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभा आहे.

मानखुर्द- शिवाजीनगरमध्ये अजित पवार गटाचे नवाब मलिक हे उभे असून त्यांच्यासारखे नाव असलेले दोन उमेदवार येथून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मुक्ताईनगर मधून रोहिणी खडसे या उभ्या असून या ठिकाणी त्यांचे नाव असलेल्या दोन महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. विदर्भात देखील काही मतदार संघात हाच पॅटर्न सुरू असून यामुळे उमेवारांची डोकेदुखी वाढणार आहे.

पक्षचिन्ह ठरणार महत्वाचे

दुहेरी नावाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने अनेक उमेदरांची डोकेदुखी वाढणार आहे. मतदारांचा संभ्रम होऊन मतांची विभागणी होण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यामुळे पक्षचिन्ह महत्वाची भूमिका बजावणार आहे. मतदारांना संभ्रम टाळण्यासाठी पक्षचिन्ह बघून बटन दाबावे लागणार आहे. एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणूक निकालावर काय परिमाण करणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

 

Whats_app_banner