Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह अनेक प्रमुख पक्षांचे नेते महाराष्ट्रातील कानाकोऱ्यात जाऊन तेथील जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १३ ऑक्टोबर रोजी गोरेगाव नेस्को मैदानावर पक्षाच्या गटाध्यक्षांना संबोधित करण्यासाठी सभा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही मोठी आणि महत्त्वाची बैठक असणार आहे.
सध्या राज ठाकरे महाराष्ट्राच्या निवडणुकांसंदर्भात सतत बैठका घेत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची काल (सोमवारी, ०७ ऑक्टोबर) पुण्यात बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या जिल्ह्यांतील प्रत्येक विधानसभेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष २०० ते २२५ जागा लढवणार असल्याचे त्यांनी घोषणा केली. त्यावेळी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना आमचा पक्ष एकटाच निवडणूक लढवणार आहोत. तसेय या निवडणुकीत मनसेच्या अधिक जागा निवडून येतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता.
राज ठाकरे १३ ऑक्टोबर रोजी गोरेगाव नेस्को मैदानावर पक्षाच्या गटाध्यक्षांना संबोधित करतील, तेव्हा त्यांचा पक्ष एनडीएसोबत जाण्याच्या अटकळींबाबत चित्र स्पष्ट होऊ शकते. निवडणूक आयोगाने अद्याप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.
नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. देशाच्या आणि तरुणांच्या भविष्यासाठी पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्वाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही मनसे प्रमुख म्हणाले होते.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. आगामी महाराष्ट्र निवडणुकीत युबीटी शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश असलेली महायुती आघाडी यांच्यात लढत होणार आहे. मात्र, या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संबंधित बातम्या