Weather Updates: राज्याच्या काही भागात उन्हाचे चटके जाणवत असताना पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर,
हवामान विभागाच्या माहितीनुसार, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात बुधवारी मालेगाव आणि सोलापूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मालेगाव येथे ४१.६ आणि सोलापूर येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज अहमदनगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे (३९.०), अहमदनगर (३८.८), धुळे (३९.०), जळगाव (३९.५), जेऊर (४३.०), कोल्हापूर (३९.१), महाबळेश्वर (३२.७), मालेगाव (४१.६), नाशिक (३७.७), निफाड (३६.९), सांगली (३९.९), सातारा (३९.२), सोलापूर (४०.२), सांताक्रूझ (३४.२), डहाणू (३३.७), रत्नागिरी (३३.६), छत्रपती संभाजीनगर (३८.६), बीड (३८.३), नांदेड (३८.९), धाराशिव (३९.८), परभणी (३८.२), अकोला (३८.३), अमरावती (३५.८), बुलडाणा (३७.४), ब्रह्मपुरी (३६.०), चंद्रपूर (३६.२), गडचिरोली (३५.२), गोंदिया (३३.६), नागपूर (३४.५), वर्धा (३४.५), यवतमाळ (३७.७).
मार्च २०२४ पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वात उष्ण ठरला. युरोपियन युनियनच्या क्लायमेट चेंज मॉनिटरिंग सर्व्हिसने दावा केला आहे की, गेल्या १० महिन्यांच्या उष्णतेने जागतिक स्तरावर नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. यावेळी जगाने सर्वात उष्ण मार्च अनुभवला आहे. याआधी मे आणि जुलैदरम्यान सर्वाधिक उकाडा जाणवायचा. परंतु, आता मार्चपासूनच लोकांना घाम फुटू लागला आहे.