Maharashtra Heat Stroke: महाराष्ट्रातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहेत. राज्यात पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. २६- २७ मार्च २०२४ या कालावधीत कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २२°C च्या आसपास असेल. महाराष्ट्रात काल मालेगांव येथे ४०.८ °C कमाल तापमानाची नोंद झाली. तर, अहमदनगर येथे १४.३ °C हे सर्वात कमी किमान तापमान होते.
मुंबईच्या तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपनगरात सलग दोन दिवस तापमानाने ३८°C अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ नोंदवण्यात आली. हवेतील कमी आर्द्रतेमुळे, तापमान ४०°C सेल्सिअसपेक्षा फक्त एक अंश सेल्सिअस कमी आहे. बुधवारीही उपनगरातील कमाल तापमान ३८.७ °C वर पोहोचले होते.
हवामान विभागाने एप्रिल महिन्यात भारतात कमालीचे तापमान आणि उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांना विशेषतः मार्च महिन्याच्या सुरुवातीस होणाऱ्या तीव्र उष्णतेचा फटका बसेल.