Maharashtra Weather Update : राज्यात बुधवारी पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्ममळून पडली. दरम्यान, आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या रायगड, रत्नागिरी, धुळे जळगाव, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ५० ते ६० किमी प्रतीतास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेचे लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
वातावरणातील खालच्या स्तरातील वाऱ्याची चक्रीय स्थिती पूर्व विदर्भ व लगतच्या परिसरात आहे. या स्तरामध्ये वाऱ्याची द्रोणीका रेषा दक्षिण मध्य कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत जात आहे. त्यामुळे राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज व उद्या विदर्भातील बुलढाणा वाशिम आणि वर्धा वगळता उर्वरित जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ३० ते ४० वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील सर्व जिल्ह्यांना आज व उद्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यापैकी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. १७ मे रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्हे तर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे . उर्वरित राज्यात देखील काही ठिकाणी मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ व १९ मे रोजी राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी रात्री पुण्याला वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. काही वेळातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान, आज देखील पुणे आणि आजू बाजू च्या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.