Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार असून राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशाची घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आला आहे. राज्यात विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यात पहाटे धुके, दुपारी उकाडा आणि रात्री थंडी जाणवत आहे. बदलत्या तापमानामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशाची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. राज्यात गुरुवारी नागपूर, धुळे, गोंदिया, भंडारा येथील पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.
पुणे २९.८ (१३.७), अहिल्यानगर ३०.१ (१२.५), धुळे ३० (९.५), जळगाव २८.२ (१२.९), जेऊर ३१.५ (१४.५), कोल्हापूर २९.६ (१७.८), महाबळेश्वर २५.५ (१३.८), मालेगाव २७.८ (१४.६), नाशिक २९.८ (१३.७), निफाड २८.६ (११.२), सांगली ३१.२ (१६.४), सातारा ३१.२ (१४.८), सोलापूर ३२.२ (१६.२), सांताक्रूझ ३४.४ (१९), डहाणू २९.३ (१९.१), रत्नागिरी ३४ (२०.४), छत्रपती संभाजीनगर ३१ (१४.४), धाराशिव ३१.२ (१४.८), परभणी २९.६ (१४.४), परभणी कृषी विद्यापीठ २९.६ (१४.४), अकोला ३१.८ (१४.६), अमरावती ३१.२ (१२.४), भंडारा (१०), बुलडाणा २९.४ (१४.८), ब्रह्मपुरी २९.७ (११.३), चंद्रपूर २९.२ (-), गडचिरोली २९.६ (१२.४), गोंदिया २६.७ (९.८), नागपूर २९.० (८.८), वर्धा २९.५ (११.४), वाशीम ३१ (११.४), यवतमाळ ३०.५ (-).
उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी वाढली आहे. यूपी, दिल्ली, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत हवामानाचा पॅटर्न बदलणार असून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर पश्चिम हिमालयी प्रदेशात म्हणजेच उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तर भारतातील मैदानी भागात ४, ५ आणि ६ जानेवारीला पाऊस पडेल. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये ५ आणि ६ जानेवारीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.