Todays Weather Updates: महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आज अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, मुंबई आणि कोकणातील रहिवाशांची अद्याप उकाड्यातून सुटका नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या काही आठवड्यापासून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत उष्णतेने कहर केला. बहूतेक भागात दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर, दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, लातूर आणि हिंगोली येथेही अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, मुंबईसह कोकण पट्ट्यात पुढील चार दिवस उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात उद्यापासून म्हणजेच १० मे २०२४ पासून पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह वादळीवारा आणि वीज गर्जनेची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिली. अंदमान येथे २२ मे २०२४ रोजी मान्सूनचे आगमन होणार आहे. तर, राज्यात १२ ते १३ जून २०२४ पासून मान्सूनला सुरुवात होईल. पण २२ जून २०२४ नंतरच पेरणी योग्य पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यावर्षी जुलै महिन्यात जोरदार पाऊस होईल. तर, ऑगस्ट महिन्यात कमी प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसात वाढ होऊ शकते. राज्यात ७ मे २०२४ ते ११ मे २०२४ दरम्यान अनेक भागांत पूर्व मौसमी पाऊस पाहायला मिळू शकतो, अशीही शक्यता डख यांनी व्यक्त केली.