Maharashtra Weather News: महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक भागांत उन्हाचे चटके जाणवत असताना विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांत कमाल तापमानात घट झाली. वाशीम, गोंदिया येथे वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. वाशीम आणि मालेगावमध्ये गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पलिकडे पोहोचले. तर, अकोला आणि विदर्भात ४२ अंश सेल्सिअस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.
राज्यात गुरुवारी (०९ मे २०२४) वाशीम आणि मालेगाव येथे सर्वाधिक ४२.६ तापमान नोंदवले. याशिवाय, पुणे (३९.४ अंश सेल्सिअस), धुळे (४१ अंश सेल्सिअस), जळगाव (४२.४ अंश सेल्सिअस), कोल्हापूर (३७.१ अंश सेल्सिअस), महाबळेश्वर (३२.६ अंश सेल्सिअस), नाशिक (३९.२ अंश सेल्सिअस), निफाड (३८.९ अंश सेल्सिअस), सांगली (३८ अंश सेल्सिअस), सातारा (३९.२ अंश सेल्सिअस), सोलापूर (४१.६ अंश सेल्सिअस), सांताक्रूझ (३३.६ अंश सेल्सिअस), डहाणू (३४.९ अंश सेल्सिअस), रत्नागिरी (३४ अंश सेल्सिअस), छत्रपती संभाजीनगर (४०.२ अंश सेल्सिअस), बीड (४०.७ अंश सेल्सिअस), नांदेड (४०.६ अंश सेल्सिअस), परभणी (४१.३ अंश सेल्सिअस), अकोला (४२.५ अंश सेल्सिअस), अमरावती (४०.६ अंश सेल्सिअस), बुलढाणा (४०.४ अंश सेल्सिअस), ब्रम्हपुरी (४०.१ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (३९ अंश सेल्सिअस), गडचिरोली (३९.४ अंश सेल्सिअस), गोंदिया (३६ अंश सेल्सिअस), नागपूर (३९.३ अंश सेल्सिअस), वर्धा (४१ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ येथे ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
संबंधित बातम्या