IMD Rainfall Alert, Weather Update: उत्तर भारतात आलेल्या उष्णेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी खुशखबर दिली आहे. हवामान विभागाने सांगितले की, महाराष्ट्राची किनारपट्टी तसेच उत्तर कर्नाटकमध्ये येत्या पाच दिवसात (5 Days Rain) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर-पश्चिम भारतातील काही राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार आहे.दरम्यान पूर्व भारत, उत्तर प्रदेश, ईशान्य भारत व मध्य प्रदेशात येत्या पाच दिवसापर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ७ जून व ८ जूनला दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह सोलापुरातही दाखल झाला असून येत्या ४८ तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारपासून मान्सूनची व्याप्ती वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मान्सून तळकोकणात यावर्षी एक दिवस आधीच दाखल झाला आहे.
मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील ४८ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
खालील राज्यांत पुढील ४ ते ५ दिवस पाऊस -
महाराष्ट्राबरोबर बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये येत्या चार ते पाच दिवसात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. १२ जूनपासून बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल राज्यात पाऊस पडणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशमध्ये ७ ते ९ जून दरम्यान गारपीट होऊ शकते. जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये येत्या दोन दिवसात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थानमध्ये ७ व ८ जून रोजी पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातम्या