पुणे : राज्यात उष्णतेचा पारा वाढला आहे. उकड्यामुळे नागरिक त्रस्त असताना विदर्भात मात्र, अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रविवारी नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. पुढील चार दिवस विदर्भात अवकाळी पावसाचे संकट घोंगावणार असून हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी पावसाने आगेकूच केल्याने येत्या तीन दिवसांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सोबतच अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, रविवारी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी पिकांना याचा फटका बसला. हा पाऊस पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज पासून २६ मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर २२ ते २४ मे दरम्यान यलो अलर्ट देखील जारी केला आहे.