IMD Rain alert : श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीपासूनच दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाण्यासह आसपासच्या जिल्ह्यांत शनिवारी जोरदार बरसलेल्या पावसानं आज काहीशी उसंत घेतली. मात्र, आज २६ ऑगस्ट रोजी राज्याच्या विविध भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील काही भागांत सोमवार, २६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, शहरी भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस होईल असं चित्र आहे.
राज्यात मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. उजनी धरणात मोठ्या प्रमाणातक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून ६३ हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भीमा व नीरा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.