Maharashtra Weather Update : गेल्या महिन्याभरापासून मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळत असलेल्या अवकाळी पावसानं अखेरीस विश्रांती घेतली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च महिना संपत असताना आता राज्यातील हवामानात मोठे फेरबदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे. त्यामुळं आता अवकाळी पावसामुळं हैराण झालेल्या सामान्यांना उन्हाच्या चटक्यापासून आरोग्याचं संरक्षण करावं लागणार आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत आहे.
विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मार्च अखेरपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कोकण, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा वाढणार असल्याचं चित्र आहे. राज्यातील अवकाळी पावसाचं वातावरण निवळलं असून कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता एप्रिल आणि मे महिन्यात सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. त्यामुळं दुपारी ११ ते ३ वाजता घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. याशिवाय वेळोवेळी आवश्यतेनुसार पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय जाणकारांनी दिला आहे.
केंद्राचं पथक महाराष्ट्रात येणार...
गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. परिणामी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता केंद्रातील एक पथक महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केल्यानंतर त्यांना तातडीनं आर्थिक मदत केली जाणार असल्याचंही कराड यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या