Maharashtra Rain Updates : यंदाच्या हंगामातील मान्सून काही दिवसांपूर्वीच केरळात दाखल झाला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून आठवड्याभराच्या उशीराने भारतात दाखल झालाय. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात मोसमी वारे दाखल झालेत. त्यामुळं राज्यातील हवामान अचानक बदल असून कोकण तसेच अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळं आता खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं उकाडा कमी झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळं आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय कापूस, मका आणि अन्य पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळं नागरिकांची एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या जिल्ह्यातील काही भागांमध्येही रिमझिम पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. विदर्भातील वाशिम, मालेगाव आणि मंगरूळपीरमध्ये ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळ पुढील काही तासांत मुंबईसह कोकणच्या किनारी भागांत धडकण्याची शक्यता आहे. त्यातच आता मान्सून राज्यात दाखल झाल्याने कोकणासह मुंबई व ठाण्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळं मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच खरीप हंगामाच्या पेरणीला लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.