मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 21, 2023 06:23 PM IST

Maharashtra Weather Updates : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.

Weather Updates Maharashtra
Weather Updates Maharashtra (PTI)

Weather Updates Maharashtra : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. याशिवाय आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरांच्या भागांमध्येही रिमझिम पावसानं हजेरी लावल्यामुळं मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. परंतु आता पुढील पाच दिवसांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ मार्चपासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांसह सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहे. आज पहाटेपासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. मुंबईत पुढील तीन दिवस रिमझिम पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात...

मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अवकाळी पावसामुळं कांदा, मका, गहू, फळबागा आणि भाजीपाल्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. याशिवाय नाशवंत पीकं भूईसपाट झाल्यामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळं आता हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मदतीची मागणी केली जात असतानाच आता राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं चिंता वाढल्या आहेत.

WhatsApp channel