Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात वरुणराजाचं दिमाखात पुनरागमन झालं आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवार पासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला असून करपलेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळं सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. सोयाबीन, कापूस, मका आणि खरीप हंगामातील अन्य पिकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा पासून विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं करपलेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेला. त्यानंतर आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात वरुणराजाने हजेरी लावली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदूबार या जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं वाया जात असलेली पीकं वाचणार आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. परंतु पीकं हातातून जात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील खोकसा-चिंचपाडा या रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्यात वाहून गेला आहे. परिणामी जिल्ह्यातील आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळं नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
संबंधित बातम्या