Weather Update: मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; कोकण, मुंबईचं हवामान कसं असेल?
Maharashtra Weather Update : अवकाळी पावसामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीपिकांचं नुकसान झालेलं असतानाच आता पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
Weather Update Maharashtra : उन्हाळ्याचा दुसरा महिना संपत आलेला असताना राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं रब्बी पिकांची नासाडी झाली असून बळीराजा संकटात सापडला आहे. त्यानंतर आता उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आधीच रब्बी पीकं हातातून गेली असताना आगामी हंगामाही धोक्या येण्याची शक्यता असल्यानं राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात उष्णता निर्माण झाली होती. परंतु आता वादळी पावसाला पोषक हवामान होत असल्यानं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हवामानात अनपेक्षित बदल होत असल्यामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये आकाशात ढग घोंगावत आहेत. त्यामुळं बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. यापूर्वी रिमझिम पावसानं हजेरी लावल्यामुळं मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
विदर्भावर आठवडाभर अवकाळी पावसाचं सावट...
शुक्रवार पासून पुढील सात दिवस विदर्भातील नागपूर, बुलढाणा, अमरावती, वाशिम, भंडारा, गोदिंया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेडसह लातूर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.