Maharashtra Weather Updates : यंदाचा पावसाळा संपण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी उरलेला आहे. परंतु अद्यापही राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस कमी झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्रात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय २२ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान कोकण, मुंबई, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. २९ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता शेवटी का होईना, राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या हंगामात मान्सूनने चांगलाच तडा दिला आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात चौहीकडे मुसळधार पाऊस झाला होता. जून आणि ऑगस्ट हे दोन महिने कोरडेच गेल्याने शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं. परंतु शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करत नव्या जोमाने पीकं उभी केली आहे. परंतु आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करूनही पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस होत असल्याने सोयाबीन, कापूस आणि मका यांसारख्या पिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
संबंधित बातम्या