Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये दीड दिवसांच्या गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन केलं जात आहे. गार वारा आणि हलक्या सरींमध्ये अनेक भाविक बाप्पांना अखेरचा निरोप देत आहे. बाप्पांचं आगमन होताच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता आजपासून पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होत आहे. या हवामानाचा महाराष्ट्रावरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. पुढील दोन दिवस मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे. आजपासून पुण्यासह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील खेड, चिपळूण, गुहागर आणि सावंतवाडीत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.