Weather Updates Today: महाराष्ट्रात उन्हाचा कडाला वाढला असून येत्या दोन दिवसांत राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुंताश शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. बुधवारी अकोल्यात सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. विदर्भ, मराठवाडा, उत्तर- मध्य महाराष्ट्र या भागात तीव्र उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. जळगाव, मालेगाव, बीड, जालना, नांदेड, परभणी, यवतमाळ, लातूर, धाराशिव, सोलापूर, नागपूर, वर्धा, बुलढाणा, ब्रह्मपुरी, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, यांसह बहतांश जिल्ह्यातील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे.
मुंबई (३१.४), अलिबाग (३०.०), रत्नागिरी (३२.२), डहाणू (३२.६), पुणे (३९.०), लोहगाव (४०.०), कोल्हापूर (३८.२), महाबळेश्वर (३३.३), मालेगाव (४१.०), नाशिक (३९.८), सांगली (३८.७), सातारा (३८.९), सोलापूर (४१.४) छत्रपती संभाजीनगर (३९.५), परभणी (४०.८), नांदेड (३९.८), बीड (४०.३), अकोला (४१.५), अमरावती (४०.४), बुलढाणा (४०.२), ब्रम्हपुरी (४०.१), चंद्रपूर (३८.६), गोंदिया (३८.०), नागपूर (३९.०), वाशिम (४१.३) आणि वर्धा येथे बुधवारी ४०.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
- डिहायड्रेशपासून बचाव वारंवार पाणी प्यावे.
- सुती, सैल, फिक्या रंगाचे कपडे घाला.
- अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडणे टाळावे.
- घराबाहेर पडल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री घ्यावी.