Maharashtra Unseasonal Rains: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील आठ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. अकोला, बुलडाणा, चंद्रपूरसह राज्यातील ८ जिल्ह्यात आज अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी मात्र हवामान कोरडे राहील. आज राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. यात अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.यवतमाळ जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
जानेवारीच्या अखेरीस किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीटीसह झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यातच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २६ आणि २७ फेब्रुवारीला मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, हिमालयीन भागात मुसळधार पावसासह हिमवृष्टी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याआधीही हवामान खात्याने डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. हा अंदाज अगदी अचूक निघाला. काल म्हणजेच शनिवारी हिमाचल प्रदेशातील उंच भागात मुसळधार पाऊस झाला.
संबंधित बातम्या