Weather News: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट आणि रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. पावसाच्या आगमनामुळे राज्यातील तापमानात काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार आणि रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. तर, उर्वरित राज्यांत वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.
राज्यात शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. कोकणात शनिवारी मालवण (११० मिलीमीटर पाऊस), पालघर (९० मिलीमीटर पाऊस), दोडामार्ग (७० मिलीमीटर पाऊस), वैभववाडी (७० मिलीमीटर पाऊस), भिवंडी (६० मिलीमीटर पाऊस), कुडाळ (५० मिलीमीटर पाऊस) रामेश्वर (५० मिलीमीटर पाऊस), सुधागड पाली (३० मिलीमीटर पाऊस), चिपळूण (३० मिलीमीटर पाऊस), देवगड (२० मिलीमीटर पाऊस), गुहागर (२० मिलीमीटर पाऊस), खालापूर (२० मिलीमीटर पाऊस), संगमेश्वर (२० मिलीमीटर पाऊस), वाकवली (२० मिलीमीटर पाऊस), मोखेडा (२० मिलीमीटर पाऊस), मंडणगड येथे पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली, सुरगाणा, इगतपुरी येथे प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय, गगनबावडा, अटपाटी, तासगाव, कवडेमहांकाळ, हर्सूल, शिराळा, राहुरी, भडगाव, संख, सातारा, मीरज, नाशिक, सटाणा, शाहूवाडी, चोपडा सोलापूर येथे काल २० मिलीमीटर पाऊस झाला.
भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाणेसाठी ११ जूनपर्यंत विजांचा कडकडाट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा अंदाज देत यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी सकाळी मुंबई, ठाणे आणि कल्याणच्या काही भागांतील रहिवासी मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाने जागे झाले आणि त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला. शहर आणि ठाणे जिल्ह्यात 10 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका/मध्यम ते मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या