Weather News: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या मोसमी पावसाची गती मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, पुणे आणि साताऱ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, विदर्भासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या बऱ्याचशा भागांत पावसाने उसंत घेतली असून विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळशीपार पोहोचले. बुधवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वात उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. तर, भंडारा, चंद्रपूर येथेही उकाडा कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यातील काही भागांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वारा आणि वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण: हर्णे ९० मिलीमीटर, डहाणू ७० मिलीमीटर, कुलाबा ५० मिलिमीटर, सावर्डे ५० मिलिमीटर, गुहागर ४० मिलिमीटर, वसई ४० मिलिमीटर, अलिबाग ४० मिलिमीटर, भिवंडी ४० मिलिमीटर, मालवण ३० मिलिमीटर, वाडा ३० मिलिमीटर, वाकवली ३० मिलिमीटर, रत्नागिरी ३० मिलिमीटर आणि मुरूड ३० मिलीमीटर.
मध्य महाराष्ट्र: भडगाव ३० मिलीमीटर, गगनवाडा ३० मिलीमीटर, महाबळेश्वर २० मिलिमीटर, वेल्हे २० मिलिमीटर, लोणावळा २० मिलिमीटर, तळेगाव १० मिलिमीटर, ओझरखेडा १० मिलिमीटर,सोलापूर १० मिलिमीटर.
मराठवाडा: मुखेड ३० मिलिमीटर, देगलूर ३० मिलीमीटर, रेणापूर २० मिलीमीटर, किनवट २० मिलीमीटर.
विदर्भ: गडचिरोली ३० मिलीमीटर, भवापूर ३० मिलीमीटर, सेलू ३० मिलीमीटर, वर्धा ३० मिलीमीटर, समुद्रपूर ३० मिलीमीटर, उमरेड ३० मिलीमीटर, पातूर २० मिलीमीटर, खारंघा २० मिलीमीटर, एटापल्ली २० मिलीमीटर, मालेगाव २० मिलीमीटर, मूल २० मिलीमीटर आणि अर्जुनी मोरगाव, हिंगणा, धानोरा, अर्वी, गोरेगाव, सिंदेवाही, मंगरूळपीर, सावनेर, नागभीड प्रत्येकी १० मिलिमीटर.
जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. दरम्यान, १८ जूनपर्यंत देशात अंदाजे ८०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. पण यंदा ६४.५ टक्के पावसाची नोंद झाली. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रचा काही भाग वगळता राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनच्या अखेरिस चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात १८ जूनपर्यंत १०५ मिलिमीटर (३ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली.
संबंधित बातम्या