Todays Weather Updates: राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर, काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबईसह बऱ्याच ठिकाणी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने सरी कोसळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा या भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचंड उकाडा जाणवत आहे. हे उष्ण वारे अरबी समुद्रावरुन महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळं आर्द्रता प्रचंड वाढली. सांताक्रुझ येथे काल तब्बल ३३ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले. अरबी आणि हिंद महासागरात हवेच्या कमी दाबामुळं पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने मुंबईसह कोकणातील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळते.
पुणे (३९.५), अहमदनगर (३९.८), धुळे (४०.०), जळगाव (३८.०), जेऊर (४१.५), कोल्हापूर (३८.२), महाबळेश्वर (३३.४), मालेगाव (४२.०), नाशिक (३७.८), निफाड (३७.०), सांगली (३८.९), सातारा (३९.१), सोलापूर (४०.०), सांताक्रूझ (३३.०), डहाणू (३४.०), रत्नागिरी (३३.५), छत्रपती संभाजीनगर (३८.६), बीड (४०.५), धाराशिव (३९.५), परभणी (३८.३), अकोला (३८.३), अमरावती (३५.६), बुलढाणा (३३.८), ब्रह्मपूरी (३८.२), चंद्रपूर (३६.८), गडचिरोली (३५.०), गोंदिया (३५.४), नागपूर (३४.८), वर्धा (३५.८), वाशीम (३०.२), यवतमाळ (३६.५).
संबंधित बातम्या