Weather Updates: महाराष्ट्रातून हळूहळू थंडी गायब होत असून अनेक भागांत उकाडा वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानाने छत्तीशी गाठली आहे. राज्यात पुढील पाच दिवस निरभ्र आकाशासह किमान तापमान कायम राहून मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली आहे.
राज्यात पुढील काही दिवसांत बदल पाहायला मिळू शकतो. मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ दिवसात राज्यात किमान व कमाल तापमान सामान्य तापमानाहून अधिक असणार आहे. तर, उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमानात हळहूळू बदल पाहायला मिळेल. त्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद घेतलेल्या नागरिकांना आता उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
राज्यात मागील २४ तासांत सोलापूर येथे सर्वाधिक ३६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर, जेऊर येथे तापमानाचा पारा ३५.५ अंशावर होता. याशिवाय, रत्नागिरी आणि वाशिम अनुक्रमे ३५.७ आणि ३४.२ अंश तापमानाची नोंद झाली.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतातून हिवाळा संपणार असल्याचे संकेत आहेत. एवढेच नाही तर ११ फेब्रुवारीपर्यंत तापमान २८ अंशांपर्यंत आणि १६ फेब्रुवारीपर्यंत २९ अंशांपर्यंत पोहोचू शकते. २१ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही.
उत्तर प्रदेशातील बहुतेक भागात हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. अनेक भागात जोरदार वारे वाहत आहेत आणि दिवस उज्ज्वल आणि सूर्यप्रकाशित आहे. परंतु, फेब्रुवारीमध्ये, पश्चिमी विक्षोभाचा परिणाम कानपूर, लखनौ, आग्रा, अलीगड, जौनपूर, वाराणसी, प्रयागराज, बरेली, देवरिया, झाशी, मेरठ आणि सहारनपूर येथे दिसून येतो.
हरियाणा आणि पंजाबमध्ये हवामानातील चढउतार सुरूच आहेत. ८ फेब्रुवारी रोजी पश्चिमी विक्षोभामुळे ढगाळ वातावरण होते, त्यामुळे पावसाची शक्यता होती. पण आज हवामान स्वच्छ आहे. ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पंजाब-हरियाणा सीमेकडे सरकू शकतो. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या