Weather News: बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. याच पाश्वभूमीवर हवामान विभागाने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे दाखल होत आहेत. बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
हिमालयात बुधवारपासून (१५ जानेवारी) थंड वारा सक्रीय होण्याचा अंदाज आहे. परिणामी उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. थंड वाऱ्याचा जोर कायम राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात पारा खाली घसरण्याचा अंदाज आहे.
पुढील पाच वर्षांत अधिक रडार आणि निरिक्षण यंत्रणा बसवून हवामानाचा अंदाज वर्तवण्याची अचूकता १० ते १५ टक्क्यांनी वाढविण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी दिली. हवामान बदलामुळे जनजीवन, उपजीविका आणि अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल हवामानाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न सुरू केले, २०४७ पर्यंत भारताकडे हवामानाचा अंदाज आणि पूर्व सूचना असतील, असे महापात्रा म्हणाले. मिशन मौसमद्वारे आम्ही योजना आखत आहोत की, पुढील ५ वर्षांपर्यंत अंदाजाच्या अचूकतेत कमीतकमी १०-१५ टक्क्यांनी सुधारणा झाली पाहिजे आणि ५ वर्षांनंतर कोणतीही गंभीर हवामानपरिस्थिती, मग ती वीज असो, वादळ किंवा स्थानिक मुसळधार पाऊस यासाठी अनेक निरिक्षण यंत्रणांची स्थापना केली जाईल, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या