Weather News: महाराष्ट्राच्या तापमान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान घसरले असताना हवामान विभागाने आज उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पारा १० अंश सेल्सिअसखाली घसरल्याने गारठा वाढला आहे. मात्र, पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यात उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात शुक्रवारी धुळे (६ अंश सेल्सिअस) जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कडक्याची थंडी पडली आहे. राज्यात निफाड, अहिल्यानगर, परभणी, बीड, नागपूर गोंदिया, गोंदिया, ब्रह्मपुरी आणि जळगाव येथे पारा १० अंश सेल्सिअस खाली घसरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात गारठा कायम राहणार असून किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे २३.२१ °C आणि २४.६६ °C राहण्याचा अंदाज आहे. उद्या आर्द्रतेचे प्रमाण ६०% राहील.
दरम्यान, वायू प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. शहरातील वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघेल की, दरवर्षी दिवाळीनंतर नागरिकांना धुराच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. बेकरींनी लाकूड आणि कोळशाच्या वापरावर बंदी घालावी, असेही हायकोर्टाने सुचवले. सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या वापरावर भर देण्यात यावा. मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, मुंबईच्या ढासळत्या वायु गुणवत्ता निर्देशांकामागील समस्या आणि कारणांची सर्व प्राधिकरणांना व्यापक माहिती आहे, परंतु यावर उपाय योजना आणि करावयाच्या पावलांची त्वरित अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या