मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 04, 2024 11:19 AM IST

IMD High Sea Waves Alert : मुंबईसह किनारपट्टीच्या परिसरात येत्या ३६ तासांत उंचच उंच लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता
येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

IMD High wave Alert : अलीकडं हवामानात सातत्यानं बदल होताना दिसून येत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेनं जिवाची काहिली होत असतानाच मुंबई महापालिकेनं एक नवी बातमी दिली आहे. पुढच्या ३६ तासांत समुद्राच्या भरतीच्या वेळी उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस (INCOIS) यांनी ही माहिती दिली आहे. त्यानुसार, शनिवार, ४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून ते रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत उंच लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या लाटांमुळं किनारपट्टीच्या परिसरात तसंच, सखल भागांमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे.

मच्छीमार बांधवांना आवाहन

भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होऊ शकते. अनुचित घटना टाळण्यासाठी येत्या ३६ तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणं टाळावं. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. आपापल्या बोटी किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळं एकमेकांना धडकून बोटींचं नुकसान होणार नाही, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावं, अशी विनंतीही महापालिकेनं केली आहे.

महापालिका सज्ज

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीनं नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्तानं समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळं किनारपट्टी भागात राहत असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

या संपूर्ण परिस्थितीवर मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावं, समुद्रात शिरू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावं, असंही सांगण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point