Weather News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसापासून दिलासा मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आज मुंबई आणि ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. मुंबईत शुक्रवारनंतर आठवड्याच्या शेवटी ढगाळ आकाश आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुंबईत गुरुवारी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. शहरात गुरुवारी सखल भाग आणि अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये हलके पाणी साचले, तसेच वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे सार्वजनिक वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही, लोकल गाड्या वेळेवर धावत होत्या.
केवळ मुंबईच नाही तर दिल्ली एनसीआरमध्येही बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह अनेक भागात पाणी साचले. हवामान विभागाने दिल्लीसाठी यलो अलर्ट जारी केला असून नोएडा आणि गुरुग्रामसारख्या शेजारच्या भागातही आठवडाभर मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. गुडगावमध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गुरुवारी सायंकाळी शहरातील रहिवासी गुडघाभर पाण्यातून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.