Maharashtra Weather News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतला. मान्सून परतल्यानंतरही राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार सुरू आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. याशिवाय, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ऊन- पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पुणे- ३३.७ सेल्सिअस, जळगाव- ३२.४ सेल्सिअस, कोल्हापूर- ३१.१ सेल्सिअस, महाबळेश्वर- २७.५ सेल्सिअस, मालेगाव- ३१.२ सेल्सिअस, नाशिक- ३२ सेल्सिअस, निफाड- ३२ सेल्सिअस, सांगली- ३२.८ सेल्सिअस, सातारा- ३२.३ सेल्सिअस, सोलापूर- ३४.६ सेल्सिअस, सांताक्रूझ- ३३.९ सेल्सिअस, डहाणू- ३२.६ सेल्सिअस, रत्नागिरी- ३३ सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर- ३२.६ सेल्सिअस, धाराशिव- ३२.६ सेल्सिअस, परभणी- ३३ सेल्सिअस, अकोला- ३५.५ सेल्सिअस, अमरावती- ३४ सेल्सिअस, भंडारा- ३२ सेल्सिअस, बुलडाणा- २९.६ सेल्सिअस, ब्रह्मपुरी- ३६.७ सेल्सिअस, चंद्रपूर- ३५ सेल्सिअस, गडचिरोली- ३४ सेल्सिअस, गोंदिया- ३४.४ सेल्सिअस, नागपूर- ३४.१ सेल्सिअस, वर्धा- ३४ सेल्सिअस, यवतमाळ- ३३ सेल्सिअस.
मान्सून माघारी परतल्यानंतरही देशातील अनेक भागात पावसाची प्रक्रिया थांबलेली नाही. तामिळनाडू, छत्तीसगड, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. तर मुसळधार पावसामुळे तामिळनाडूची दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय प्रशासनाने लोकांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे.
राज्य सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये सुट्टी चे आदेश दिले आहेत. ईशान्य मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एमके स्टॅलिन यांनी १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे, यासाठी आयटी कंपन्यांना सल्ला देण्यास प्रशासनाला सांगितले आहे.
दरम्यान, १४ ऑक्टोबरच्या रात्री तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर पाणी साचले. पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी चेन्नई आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांचा दौरा केला. हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. चेन्नईतील परिस्थिती अशी आहे की, वाहने बुडण्याच्या भीतीने अनेकांनी आपली वाहने उड्डाणपुलावर उभी केली.
संबंधित बातम्या