MNS Sandeep deshpande on Mukesh Ambani : ‘गुजराती असल्याचा अभिमान आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही नेहमीच गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील,' असं वक्तव्य रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. जर त्यांची कंपनी ही गुजरातची असेल तर त्यांनी येथील गाशा गुंडाळावा आणि गुजरातला जावे असे त्यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना म्हटले आहे.
मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पुन्हा मान मिळवला आहे. त्यांनी बुधवारी गुजरातला मातृभूमी आणि कर्मभूमी म्हटलं असून रिलायन्स ही कायम गुजराती कंपनी होती आणि राहील असे म्हटले होते. त्यामुळे मनसे आता आक्रमक झाली आहे.
अंबानी यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे, असे आम्हाला वाटत होते. पण अंबानी यांनी त्यांची कंपनी गुजरातची असल्याचे काल जाहीर केले. जर तुमची कंपनी गुजरातची होती तर महाराष्ट्रात आलेच कशाला? मराठी माणसाने जमिनी दिल्या. त्याच्या जोरावर नफा मिळवून तुम्ही उद्योग करता. जर तुमचा आणि महाराष्ट्राचा संबंधच नसेल तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा. यापुढे मराठी माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, आपण एका गुजरातच्या कंपनीकडून वस्तू घेत आहोत, मुकेश अंबानी यांचा उद्देशच जर गुजरातचा विकास असेल तर महाराष्ट्रात काय करता आहात ? असा संतप्त सवाल देखील देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
देशपांडे म्हणाले, अंबानी यांनी हे वक्तव्य केले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्यांच्या शेजारी होते. त्यांनी त्यांना दुरुस्त करणे गरजेचे होते. का पंतप्रधान देखील फक्त गुजरातचे आहे का? असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला. आम्ही जेव्हा मराठीच मुद्दा उपस्थित करतो गतेव्हा सर्व देश आम्हाला संकुचित संबोधतो. मग आता संकुचित कोण आहे हे देखील त्यांनी सांगावे. या मुद्यावरून मराठी माणसाने जागरूक होणे ही आता काळाची गरज आहे.