उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीचा भाजपच्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देत महाराष्ट्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसह पुणे, ठाण्यासह अन्य प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांनी तब्बल दोन दशकांच्या मतभेदानंतर किरकोळ मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून हातमिळवणी करण्याचे संकेत देत दोघांमध्ये संभाव्य सामंजस्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मनसेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देऊ केला होता, परंतु सहा महिन्यांनंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली.
ठाकरे बंधूंशी संबंधित राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव-राज युतीचा मुंबईच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी भाजपने सविस्तर सर्वेक्षण सुरू केले आहे. ते म्हणाले की, अंतर्गत मूल्यांकनाच्या निष्कर्षांनुसार, त्यांच्या संभाव्य युतीमुळे शहरातील भाजपच्या भवितव्याला फटका बसण्याची शक्यता नाही.
पारंपरिक मतदारांचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची उत्कृष्ट कामगिरी या तीन महत्त्वाच्या बाबींच्या जोरावर मुंबईत भाजप आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
पारंपरिक मराठी मतदार संख्या असलेल्या भागातही भाजपचा पाठिंबा कायम आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे पक्षाच्या जागावाटपावर विपरीत परिणाम होणार नसल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुंबईतील प्रभाव कमी झाला असून पक्षाचे जवळपास निम्मे नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत, असेही या मूल्यांकनातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचा प्रभाव मर्यादित असल्याचे मानले जात आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने १५० जागा (एकूण २२७ पैकी) लढविल्यास त्याचा फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार पक्षाची तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या