मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shraddha Murder : तक्रारीवर कारवाई झाली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता; फडणवीसांचा मविआवर निशाणा

Shraddha Murder : तक्रारीवर कारवाई झाली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता; फडणवीसांचा मविआवर निशाणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 23, 2022 03:36 PM IST

Shraddha Walker Murder Case : आफताबच्या त्रासाला कंटाळून श्रद्धा वालकरनं मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis - Shraddha Walkar
Devendra Fadnavis - Shraddha Walkar

Devendra Fadnavis On Shraddhav Walker Murder Case : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. आफताबच्या छळाला कंटाळून श्रद्धा वालकरनं २०२० मध्ये मुंबईतील वसई पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केल्याचं वृत्त समोर आल्यानंतर आता त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्रद्धानं मुंबई पोलिसांना लिहिलेल्या तक्रारीचा अर्ज माझ्याकडेही आला आहे, ते मी पाहिलं आहे. ते अत्यंत सिरीयस पत्र असून त्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी आम्हाला करावी लागेल. मला कुणावरही आरोप करायचा नाही, परंतु अशा प्रकरणात कारवाई झाली नाही तर पुढील घटना घडत असतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धा वालकरनं लिहिलेल्या त्या पत्राची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.

श्रद्धाच्या पत्रावर वेळी कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता का?, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, हो, वेळी कारवाई झाली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मविआ सरकारला टोला लगावला. याशिवाय श्रद्धा वालकर प्रकरणावर फडणवीसांनी सविस्तरपणे बोलणं टाळल्याचं दिसून आलं.

आफताब पुनावाला हा मला सातत्यानं शारीरिक आणि मानसिक त्रास देत असून तो माझे तुकडे-तुकडे करून हत्या करू शकतो, याची भीती वाटते, अशा आशयाचा तक्रार अर्ज श्रद्धानं २०२० मध्ये मुंबईतील वसई पोलिसांना लिहिला होता. त्यामुळं त्या पत्रावर कारवाई का झाली नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालानं दिल्लीतील साकेत कोर्टात गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांसह चार राज्यांचे पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. श्रद्धाची हत्या करण्यासाठी आफताबनं करवत आणि हातोड्याचा वापर केल्याचं समोर आलेलं आहे. याशिवाय आता आफताब-श्रद्धा हे हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेले असता तिथं त्यांनी गांजाची खरेदी केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर श्रद्धाच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर मित्रानं पाठवलेल्या मेसेजबाबतही पोलिसांनी खुलासा केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणात दररोज नवेनवे खुलासे होत आहे.

WhatsApp channel