Pune News: मकरसंक्रांत अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी हा सण उत्सवात साजरा केला जातो. विशेषत: मुले पतंग उडवून हा सण साजरा करतात. मात्र, आता मुलांनी पतंग उडवल्यास थेट पालकावर कारवाई केली जाणार आहे. पुण्यात चायनीज मांजावर बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जात आहे. यामुळे अनेक जण गेल्या काही दिवसांत जखमी झाले आहे. त्यामुळे चाईनीज मांजा वापरुन जर मुलांनी पंगत उडवल्यास आता थेट पालकांवर कारवाई करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
मकरसंक्रांत निमित्त मुले पंगत उडवून आनंद साजरा करत आसतात. या साठी अनेक दुकानांवर पंतग आणि मांजा घेण्यासाठी गर्दी होत आहे. चायनीज मांजावर प्रशासनाने बंदी घातली आहे. असे असताना देखील अनेक दुकानदार चायनीज मांजाची विक्री करत असतात. या जीवघेण्या नायलॉन मांजामुळे पुण्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकमध्ये देखील एका व्यक्तीची मान कापून त्याला ४० टाके पडले होते. पुण्यात देखील तीन दिवसांपूर्वी नायलॅान मांजा गळ्यात अडकून एका व्यक्तीचा गळा कापला गेला होता. त्याला तब्बल ३२ टाके पडलेत होते. तर कात्रजचे रहिवासी असलेले सतीश फुलारी हे देखील काही दिवसांपूर्वी मुलीला शाळेतून घेऊन येत असताना कात्रज-कोंढवा रस्त्यावर त्यांच्या गळ्याला नायलॅान मांजा अडकला होता, त्यामुळे त्यांचा गळा कापला होता. या घटनेत ते सुदैवाने वाचले. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
नायलॉन मांजाची विक्रीकेल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विनोद महाजन व पोलीस हवालदार नागेश सिंग कुवर यांनी धानोरी येथील मुंजाबा वस्ती मैत्री पार्क येथे एका महिलेवर कारवाई करत १६०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला होता. तसेच या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आता पोलिस मांजा विक्री करणाऱ्यांबरोबर आता हा मांजा वापरुन पतंग उडवणाऱ्या मुलांच्या पालकांवर देखील कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. गुन्हे शाखेच्या उपायुक्तांनी याबाबतची पोलिसांची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. असून त्यामुळे जर मूल चायनीज मांजा वापरुन पतंग उडवणार असेल तर आता पालकांना मुलावर लक्ष द्यावे लागणार आहे. नायलॉन म्हणजेच चायनीज मांजा वापरुन होणारे अपघात पाहता आता पालकांवर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
संबंधित बातम्या