Andheri Bypoll : अंधेरीत लढलो असतो तर निश्चित जिंकलो असतो; आशिष शेलारांनी व्यक्त केली खंत
Andheri Bypoll Result : भारतीय जनता पक्षामुळंच ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाल्याचं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.
Andheri East Bypoll Result 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा मोठा मताधिक्यानं विजय झाला आहे. त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संकटात सापडलेल्या ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विजयानंतर ऋतुजा लटके आणि माजी मंत्री अनिल परब यांनी या निवडणुकीत भाजपनं माघार घेऊन कुरघोडी केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आशिष शेलारांनी या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत विजयी उमेदवार ऋतुजा लटकेंचं अभिनंदन केलं आहे. लटकेंचा भाजपमुळंच विजय झाला असून आम्ही निवडणूक लढवली असतील तर निश्चित विजयी झालो असतो, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकपसह डझनभर पक्षांनी पाठींबा देऊनही 'शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे' गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली, भाजपनं निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता, असंही आशिष शेलार म्हणाले.
अंधेरीतील पोटनिवडणुकीसाठी भाजपनं मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केल्यानंतर भाजपनं या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती. परंतु आता विजयी उमेदवार ऋतुजा लटके आणि माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजपनं माघार घेऊनही लोकांना नोटाला मतदान करण्याचं आवाहन केल्याचा आरोप केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंना ६६,२४७ मतं मिळाली असून नोटा या पर्यायाला १२,७७६ मतं मिळाली आहेत. त्यामुळं या निवडणुकीत मोठ्या संख्येनं मतदारांनी नोटा पर्यायाला मतदान केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.