CISCE ISC ICSE Result 2024 : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डाच्या (Indian Certificate of Secondary Education) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल आज (सोमवार) जाहीर झाला. दहावीचा निकाल ९९.४७ टक्के तर बारावीचा निकाल ९८.१९ टक्के लागला आहे. आयसीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत ठाण्यातील विद्यार्थी देशात अव्वल आला आहेत. त्याने ४०० पैकी ३९९ गुण पटकावले आहेत. आयसीएसई बोर्डात देशात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याचे नाव रेहान सिंह (rehan singh ) असे आहे.
रेहान सिंह ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी आहे. तो संपूर्ण भारतातून पहिला आला आहे. रेहानला आयसीएसई बोर्ड परीक्षेत ९९.७५ टक्के गुण मिळाले आहे. त्याचे १०० टक्के गुण केवळ एका गुणाने हुकले.
आपल्या घवघवीत यशाबद्दल रेहान सिंह म्हणाला की, आई-वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचनाची आवड आहे. तसेच मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिखाण करायला आवडते. यूपीएससी परीक्षा देऊन भारतीय परराष्ट्र सेवेत करिअर करण्याचे स्वप्न असल्याचे रेहानने सांगितले.
सीआयएससीई परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक होते. गेल्या वर्षी सीआयएससीई दहावीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.९४ टक्के होती. त्यापैकी ९९.२१ टक्के मुली आणि ९८.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. तर, बारावीचा निकाल ९६.९३ टक्के आहे. त्यापैकी मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०१ टक्के आहे. तर, मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे.
यावर्षी २ हजार ६९५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आयसीएसई परीक्षा दिली. यापैकी २ हजार २२३ शाळांनी १०० टक्के गुण मिळवले. तर, १ हजार ३६६ शाळांमधील मुलांनी आयएससी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी ९०४ शाळांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यंदा एकूण ९९.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६५ टक्के आहे. त्याचप्रमाणे आयएससी बारावीमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.९२ टक्के आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के आहे.
संबंधित बातम्या