राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बालसिंग चहल यांना हटवण्यात आल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली असली तरी मुंबई पालिकेचे आयुक्तपद अद्याप रिक्त आहे. या जागेवर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांचीही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालपदी बदली करण्यात आली आहे.
अभिजीत बंगार यांची पी. वेलरासू यांच्या जागी बदली करण्यात आली आहे. अमित सैनी यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. जळगाव जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारीपदी शुभम गुप्ता, तर धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून विशाल नरवडे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनाही पदावरून हटवण्यात आलं असून अद्याप त्यांची इतर जागेवर बदली करण्यात आलेली नाही. तर, नागपूरच्या एनएमआरडीएच्या आयुक्तपदी संजय मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून मनोजकुमार सुर्यवंशी यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. ते नवीन नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
कार्तिकेयन एस. यांची बदली कोल्हापूर जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर झाली आहे. तर कोल्हापूर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथे झाली आहे.