राजकारणात छोट्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्वोच्च नेत्यांबद्दल कौतुकाचे उद्गार काढणं हे नवीन नाही. बहुतेक राजकीय कार्यक्रमात हे चित्र दिसतं. राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एका कार्यक्रमात काढलेले कौतुकोद्गार सध्या जोरदार चर्चेत आहे. मी अमृता फडणवीस यांना यापुढं 'मॅम' नव्हे तर 'माँ अमृता' संबोधणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस या सामाजिक कार्यात सक्रिय असतात. दिविजा फाऊंडेशनच्या वतीनं त्या दरवर्षी गणेश विसर्जनाच्या नंतर समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवतात. यंदाही विसर्जनानंतर त्यांनी अशीच मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या या कामानं लोढा भारावून गेलेले दिसले.
स्वच्छतेच्या संदर्भातील या कामाविषयी बोलताना लोढा यांनी अमृता फडणवीस यांची तोंडभरून स्तुती केली. 'समुद्र किनाऱ्यावरचा कचरा दिविजा फाऊंडेशन साफ करते ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. मात्र याचबरोबर फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या राजकारणात झालेली घाणही साफ करावी, अशी विनंती लोढा यांनी यावेळी केली.
‘अमृताताईंनी आता 'माँ’चं रूप घेतलं आहे. त्यांच्या माध्यमातून मुला-मुलींसाठी व इतर जी काही कामे होत आहे, ती कौतुकास्पद आहे. ते पाहता यापुढं त्यांना मी मॅम अमृता नाही तर माँ अमृता संबोधणार, असं मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले.