Pankaja Munde Parli Vaijnath : बीड जिल्ह्यात दबदबा निर्माण करणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर संपलेलं असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकमेकांची भेट घेत कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावली. २०१९ साली पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु आता खुद्द पंकजा मुंडे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत त्या परळीतूनच निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत परळीत पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे.
बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझे समर्थक मला राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सांगतात. परंतु कुठेही जाणार नाही, मी माझ्याच मतदारसंघात आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी अशा कोणत्याही अफवा परसवू नयेत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पाथर्डीतून नाही तर परळीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्यामुळं आता परळीत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जिल्ह्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची राज्याच्या राजकारणातून पिछेहाट झालेली आहे. परळीतून पराभव झाल्यानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतलं नव्हतं. पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना भाजपचं महासचिव करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंकजा यांनी परळीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळं बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.