राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर आम्ही जेलमध्ये असू…. मी तर बॅग भरून ठेवली आहे…पहिल्या १०० दिवसांच्या आतच सरकार मला जेलमध्ये टाकेल, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील वीटा येथील भाजप शहराध्यक्ष पंकज दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, ‘ राज्यात चुकून जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर तुम्ही लोक आम्हाला कुठे बघाल याचा विचार करा. आम्ही पुढील सहा महिन्यात आम्ही दोघे कोल्हापूरच्या जेलमध्ये गोट्या खेळत असू...आम्हाला ही लोकं काही बाहेर ठेवणार नाही. मला तर पहिल्या शंभर दिवसातच जेलमध्ये टाकतील. हे मला माहीत आहे. मी तर बॅगच भरून ठेवलीय. पण मी एक निर्धार केला आहे की महायुतीचं सरकार असंच जाऊ देणार नाही. मी मेहनत करेन, जिद्द दाखविन…दिवसरात्र महाराष्ट्र पिंजून काढेन…आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणून दाखविन. हे काही राजकारण्यांपुरतं राहिलेलं नाही. हा गँगवार सुरू झाला आहे’ असा आरोप नितेश राणे यांनी केलं.
महाविकास आघाडीमधील सर्व नेते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडले आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची वेळ खराब आहे. मात्र त्यांचं नशीब खराब नाही. जरा वेळ जाऊ द्या...ऊठसूट ज्या भानगडी सुरु आहेत, त्या बंद होतील, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या भागातील टँकरचे मोर्चे संपले होते, चारा छावणीची मागणी संपली होती, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
२०२४ची निवडणूक ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शेवटची निवडणूक ठरणार असल्याचे पडळकर म्हणाले. २०२९ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) हा पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मग शरद पवार यांच्या पक्षात जात असलेले नेते २०२९ नंतर कोणत्या पक्षात जाणार, असा सवाल पडळकर यांनी केला.