Uday Samant News: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काहीच वेळ शिल्लक असताना माजी मंत्री उदय सामंत यांनी एका नामांकीत वृत्तपत्रावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर उदय सामंत यांनी संबंधित वृत्तपत्राचा फोटो देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यात त्यांनी भविष्यात शिंदेंची शिवसेना राहणार नाही, असे वक्तव्य केल्याचे मजकूर दिसत आहे. यावर उदय सामंतांनी स्पष्टीकरून देत ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली.
नुकतेच उदय सामंत यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'एका नामांकीत वृत्तपत्राने अत्यंत खोडसाळपणाची बातमी दिली आहे. अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य मी केलेले नाही. मला चौथ्या लोकशाहीच्या स्तंभाचा आदर आहे.परंतु, जे घडल नाही ते दाखवले गेले, हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने काही संभ्रम निर्माण करणे, ही राजकारणातील वाईट गोष्ट आहे. यावर कायदेशी कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.'
उदय सामंत म्हणाले की,'एक बातमी माझ्या नावाने दाखवली जात आहे. एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आली आहे की, मी असे बोललोय की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना विलीन होणार आहे. इतक्या वाईट पद्धतीने मी न बोललेले प्रसार माध्यमात दाखवण्यात आले. मला चौथ्या लोकशाहीच्या स्तंभाचा आदर आहे. परंतु, जे घडले नाही, ते दाखवले गेले, हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने काही संभ्रम निर्माण करणे ही राजकारणातील वाईट गोष्ट आहे. मी सर्व पत्रकार परिषद कॅमेऱ्यांसमोर घेतलेल्या आहेत. माझी काल कुठेतरी पत्रकार परिषद झाली, तिथे मी असे वक्तव्य केले, असे यात सांगण्यात आले. पण हे फार चुकीचे आहे. याप्रकरणी मी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'
‘ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे बळ महाराष्ट्रात आहे, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवले. शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे शिवसेना इकडे नेणे, तिकडे नेणे, अशी कुठेही चर्चा झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत जिंकलेले सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तिन्ही निवडणुका लढतील’, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या