Ashish Shelar Latest news : ‘उद्धव ठाकरे हे बेगडी हिंदुत्ववादी आणि बेगडी मुंबईकर आहेत. २६ जुलैच्या पुराच्या वेळी जेव्हा मुंबईकर जीवनमरणाचा संघर्ष करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे हे ताज लँड्स एन्डमध्ये होते. मी स्वत: त्यांच्यासाठी स्यूट बुक केला होता,’ असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळं आता पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. आशिष शेलार यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे व त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर पहिला वार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर व त्यांच्या स्वभावावर शेलार यांनी सडकून टीका केली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत व मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कडवी लढत होणार आहे. त्यात मुंबई, मराठी माणूस आणि हिंदुत्व हे मुद्दे साहजिकच महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यावरूनच शेलार यांनी उद्धव यांना लक्ष्य केलं आहे. ते एका यूट्यूब चॅनेलशी बोलत होते.
'२६ जुलैला महाप्रलय झाला. मुंबईत अनेक मृत्यू झाले. तांडव झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे कुठं होते? ते ताज लँड्स एन्डमध्ये होते. त्या हॉटेलचं बुकिंगही मी केलं होतं. उद्धव ठाकरे हे माहीमला अडकले होते. बाळासाहेब मातोश्रीवर होते. माहीमच्या ब्रिजवरून बोट पाठवावी लागली. उद्धव ठाकरेंनी मला फोन केला. त्यांनी सांगितलं मला ताज लँड्स एन्डमध्ये स्यूट बुक करून द्या. माझा वाढदिवस आहे. मुंबईकर त्रस्त असताना हे वाढदिवसाची तयारी करत होते. ही ह्यांची मुंबईशी बांधिलकी आहे. हे बेगडी प्रेम आहे यांचं, असा हल्ला शेलार यांनी चढवला.
'बाळासाहेब असताना शिवसेनेशी आमचे मतभेद झाले झाले नाहीत असं नाही. मात्र, तेव्हा बाळासाहेबांचा शब्द अंतिम होता. कारण त्यांची हिंदुत्वाची भूमिका ठाम होती. त्यांच्या विचारांत स्पष्टता होती. उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या हेतूबद्दलच शंका आहे. उद्धव ठाकरे हे मित्रांशी देखील शत्रूसारखे वागतात. आमच्याशी वागले. शरद पवार यांच्याशीही तसंच वागतात. काँग्रेस आत्ताच तक्रारी करू लागलीय. एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे यांच्याशी ते शत्रूसारखेच वागले आहेत. आमचा आक्षेप हा त्यांच्या याच कार्यपद्धतीला आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आमचा आक्षेप आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल तसं काही असण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हा शिवसेना पक्षाचा काळा काळ आहे, असंही शेलार म्हणाले.
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही लढाई केली. न्यायालयापर्यंत गेलो. हिंदुत्वाच्या इतरही अनेक मुद्द्यांवर आम्ही संघर्ष केला. तेव्हा उद्धव ठाकरे कुठंही नव्हते. तरीही ते स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतात, याबद्दल शेलार यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. 'आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे भाजपला प्रश्न विचारतायत. भाजपला प्रश्न विचारताना त्यांनी शरद पवार, विलासराव, चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं हेही समाजाला सांगितलं पाहिजे. प्रामाणिक भूमिका घेऊन ते संघर्ष करत असतील तर आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. पण मर्यादा सोडून राजकीय भाष्य करण्याला आमचा विरोध आहे. भाजपला संपवण्याची भूमिका ते मांडत असतील तर भाजपला संपवणारे संपलेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. आम्ही सर्वाधिक काळ विरोधी पक्षात राहिले आहोत. आम्ही राखेतून झेप घेतलीय आम्हाला राखेची भीती दाखवू नका, असा इशाराही त्यांनी दिला.