Maharashtra Politics : मी कुणाच्या हातातलं खेळणं नाही; छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : मी कुणाच्या हातातलं खेळणं नाही; छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?

Maharashtra Politics : मी कुणाच्या हातातलं खेळणं नाही; छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?

Dec 17, 2024 02:12 PM IST

Chhagan Bhujbal In Nashik : मंत्रिमंडळातून वगळल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक सूर लावत पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला.

मी कुणाच्या हातातलं खेळणं नाही; छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?
मी कुणाच्या हातातलं खेळणं नाही; छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?

Chhagan Bhujbal News : ‘ऊठ तिथं ऊठ आणि बस तिथं बस… यातला मी माणूस नाही. आता राज्यसभेवर जा, आता निवडणूक लढवा हे सगळं ऐकायला मी कुणाच्या हातातलं खेळणं नाही,’ असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं भुजबळ यांना स्थान दिलेलं नाही. त्यामुळं भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. अधिवेशन सुरू असतानाच नागपूरहून ते नाशिकला परतले आहेत. नागपूरमध्ये सोमवारी बोलताना त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले होते. भुजबळ यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत राहायचं नाही असा आग्रह कार्यकर्ते करत आहेत. या सगळ्यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

‘मी सध्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांशी बोलतो आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहे. त्यानंतर काय करायचं ते ठरवेन, असं ते म्हणाले. 'पक्षाकडं मी लोकसभेचं तिकीट मागितलं होतं ते मला मिळालं नाही. त्यानंतर राज्यसभा मागितली ती दिली गेली नाही. आता आमदार झाल्यावर मला राज्यसभेची ऑफर दिली जातेय. हे सगळं करायला मी खेळणं आहे का? तेही करता आलं असतं पण राजीनामा दिला तर माझ्या मतदारांना मी काय उत्तर देणार, असा सवाल भुजबळ यांनी केला.

'राज्यसभेत जाण्यास माझी हरकत नाही. पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा असं माझं म्हणणं होतं. मतदारसंघात माझी काही कामं आहेत ती पूर्ण करू द्या. लोकांची समजूत घालू द्या नंतर जातो, असं मी म्हणालो होतो. पण तेही मान्य होत नाही. ऊठ तिथ ऊठ, बस तिथं बस… भुजबळ त्यातला माणूस नाही, असंही त्यांनी सुनावलं.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर