Beed wife Murder : बीडमध्ये पती आणि पत्नीमधील वाद टोकाला गेल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचे उशीने तोंड दाबून हत्या केली तर यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील वृंदावन कॉलनीत रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोंघाचीही पाच वर्षांची मुलगी मात्र या घटनेने पोरकी झाली आहे.
राधा वायभट (वय २६) व भागवत वायभट अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. भागवत हा रिक्षाचालक आहे. तो त्याच्या पत्नीसह बीड शहरात भाड्याचे घर घेऊन राहत होता. त्याला एक पाच वर्षांची मुलगी देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत हा शनिवारी रात्री घरी आला. घरी आल्यावर त्याचे आणि त्याच्या पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी भागवतने पत्नी राधा हीला मारहाण केली. त्यानंतर मध्यरात्री झोपेत पत्नी राधा हीचे उशिने तोंड दाबून तिचा खून केला. या घटनेत राधा हीच गुदमरुल्याने मृत्यू झाला. यानंतर भागवतने स्वत: देखील दरवाजाबाहेर असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीने हा प्रकार सकाळी झोपेतून उठल्यावर पहिला. या घटनेमुळे ती रडायला लागली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारी तिच्या घरी धावले. त्यांनी घरातील दृश्य पाहून ते देखील हादरले. त्यांनी या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे.
भागवत आणि राधा यांच्यात किरकोळ कारणावरून नेहमी भांडण होत होते. मात्र, हा वाद ऐवढा टोकाला जाईल असे कुणालाही वाटले नव्हते. शनिवारी रात्री किरकोळवादामुळे त्यांचे कुटुंब उधवस्थ झाले. तर लहानमुलगी आई वडिलांना पोरकी झाली. पाच वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरचे आई आणि वडिलांचे छत्र हरवले. यामुळे नातेवाईकांत तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.