Yerwada Crime : पुण्यात शनिवारी रात्री जेवणाच्या ताटात हात घातल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना येरवडा येथे एका पतीने जेवणात मिरचीचा खर्डा नसल्याने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज मच्छिंद्रनाथ पाचारणे (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे तर सुप्रिया पंकज पाचारणे (वय ४०, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पंकज हा रिक्षाचालक आहे. रविवारी सायंकाळी तो घरी आला. यावेळी त्याने पत्नीला जेवायला मागितले. पत्नीला त्याने जेवायला वाढण्यास सांगितले. पत्नी सुप्रिया यांनी जेवण वाढले. मात्र, त्यांनी जेवणात मिरचीचा खर्डा वाढला नाही. पतीने सुप्रिया यांना मिरचीचा खर्डा करुन देण्यास सांगितले. यावर सुप्रिया यांनी तुम्ही मिरची घेऊन या. मी खर्डा करून देते, असे पती पंकज याला म्हटले.
सुप्रिया यांच्या या म्हणण्याचा पंकजला राग आला. या कारणावरून त्याने सुप्रिया यांना कानाखाली मारली. यावेळी त्यांचा मुलगा आर्यनने मध्ये पडत दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या पंकजने स्वयंपाक घरातून चाकू आणला व त्याने मुलगा आर्यनला मारण्यासाठी तो उगारला. यावेळी सुप्रिया या मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडल्या. यावेळी त्यांच्यात झालेल्या झटापटीत पंकज यांच्या हातातील चाकू हा सुप्रिया यांच्या डाव्या डोळ्याखाली लागला. यात त्या जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. यानंतर त्यांनी मुलासह थेट पोलिस ठाणे गाठत आरोपी पंकज विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदार तेजपाल या प्रकरणाचा तपास करत आहेत.
धायरी येथे दारु प्याल्यानंतर एकाने ताटात हात घातल्याने झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री धायरी रस्त्यावरील त्रिमुर्ती किराणा दुकानासमोर मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी तरुणाला बांबू, दगडाने मारहाण करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य घोरपडे (वय २१, रा. घोरपडे चाळ, गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकाश ऊर्फ नन्या परदेशी, त्याचा सावत्र भाऊ सुरेश शुक्ला तसेच आणखी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आदित्यची आई राजश्री संतोष घोरपडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वत: काम धंदा न करता घरात बसलेल्या पतीने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी धानोरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७, रा. मुंजोबा वस्ती, धानोरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
संबंधित बातम्या