धक्कादायक..! मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक-husband and wife attempted suicide by drinking poison for maratha reservation critical condition in latur ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक..! मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

धक्कादायक..! मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

Sep 27, 2024 12:23 AM IST

maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी ९ दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याने लातूरमधील पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न (संग्रहित छायाचित्र)
मराठा आरक्षणासाठी लातूरमधील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न (संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत अनेक जणांनी आपला जीव दिला आहे. आज लातूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी ९ दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याने लातूरमधील पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केलं आहे.

ज्ञानोबा मारोती तिडोळे (३८), चंचलाबाई ज्ञानोबा तिडोळे (३४, रा. हासरणी, ता. अहमदपूर) असे विषारी द्रव घेतलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणासाठी जीव संपवल्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे प्रकरण बीडमध्ये ताजे असताना मराठवाड्यात आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरावली सराटी येथे आतापर्यंत पाचवेळा उपोषण केले आहे. १७ सप्टेंबरपासूनत्यांना आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषणास सुरुवात केली होती.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील हंगरगा येथील जयराम पवार यांनीही अहमदपुरात बेमुदत उपोषण सुरू केले होते.या उपोषणात ज्ञानोबा तिडोळे सहभागी झाले होते. बुधवारी सायंकाळी जरांगे-पाटील यांनी उपोषण स्थगितकेले.  त्यामुळे सहावेळी उपोषण करूनही सरकारने दखल घेतली नाही. या नैराश्येतून ज्ञानोबा तिडोळे व त्यांची पत्नी चंचलाबाई तिडोळे यांनी विष घेतले.

ज्ञानोबा तिडोळे यांनी बहीण इंदुबाई हेंडगे, चुलत भाऊ व इतर नातेवाइकांना फोन करून मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास या पती-पत्नीने विष घेतले. आरक्षण मिळत नसल्याने अकरावीत शिकत असलेल्या आपल्या मुलीचे व दोन लहान मुलींचे भवितव्य काय, त्याचे पुढे कसे होणार याच विवंचनेतून त्यांनी विष घेतले. त्यांनावेळीच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांचा जीव वाचला असला तरी दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा आंदोलन केलं होतं. नऊ दिवसांपासूनसुरू असलेले आंदोलन त्यांनी बुधवारी सायंकाळी मागे घेतलं.जरांगे यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं, अशी मागणी अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं.दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंच्या विरोधात आंदोलन सुरू केल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिला आहे.

Whats_app_banner