महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक एचएससी बोर्डाने महत्वाची घोषणा केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्र मिळण्याची तारीख परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र सोमवार २२ जानेवारीपासून मिळणार आहे.
शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायाची आहेत. वेबसाईटवर कॉलेज लॉगिनमध्ये ही प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. याबाबत काही अडचणी असल्यास विभागीय परीक्षा मंडळाशी संपर्क साधण्याच्या सूचना माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
प्रवेशपत्र ओपन करताना गुगल क्रोममध्ये करण्याची सुचना परीक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करून त्यांची प्रिंट कॉपी देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेण्याच्या सूचनाही बोर्डाने दिल्या आहेत. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा सूचनाही शिक्षण मंडळाने केल्या आहेत.
परीक्षेच्या प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषय आणि परीक्षेच्या माध्यमात काही बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा दुसरा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक /प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी कराले. तसेच प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्याला दिले जाईल.
संबंधित बातम्या