मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC EXAM : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा.. बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला, सोशल मीडियावर व्हायरल

HSC EXAM : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा.. बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला, सोशल मीडियावर व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2023 04:25 PM IST

HSC Exam maths question paper leak : बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे बारावी गणिताचा पेपर लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत परीक्षा बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला
बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला

HSC Exam paper leak on social media : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून  बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यावर्षी सरकारने नियम कडक केले आहेत. परीक्षा सुरू झाल्यानंतरच परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका हातात दिल्या जातात. तरीही कॉपीचे प्रकार समोर येत आहेत. त्यातच आज बुलडाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेआधीच गणिताचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेपर फुटू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त असतानाही ही घटना कशी घडली, असा सवाल केला जात आहे. 

ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे घडली आहे. आज बारावीचा गणिताचा पेपर होता. सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर फुटला. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर मोबाईलला बंदी असतानाही पेपर सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला, याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहे.

गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. 

पेपर फुटल्याप्रकरणी सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातही बारावी बोर्डाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाण्यात गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील कोणत्या परीक्षा केंद्रवर पेपर फुटला याची माहिती समोर आलेली नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. 

याआधी परभणी जिल्ह्यात महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काटखेडा येथेही कॉपीमुक्त अभियानाचे तीन-तेरा वाजल्याचे समोर आले होते. 

राज्यभरात ठिकठिकाणी परिक्षेमध्ये कॉपीचे सर्रास प्रकार सुरू आहे. १० वी आणि १२वी ची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबविले जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली. बैठी पथके व भरारी पथकांमध्ये वाढ केली आहे. परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका पूर्ण संरक्षणात नेण्यात येत असताना बुलढाण्यात पेपर लीक झाल्याचा प्रकार घडला आहे.

IPL_Entry_Point