Deepak Kesarkar : अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर, सुप्रिया सुळे म्हणतात…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Deepak Kesarkar : अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर, सुप्रिया सुळे म्हणतात…

Deepak Kesarkar : अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर, सुप्रिया सुळे म्हणतात…

Updated Jun 16, 2023 03:06 PM IST

Deepak Kesarkar on Ajit Pawar : शिंदेंच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना थेट सरकारमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar (HT_PRINT)

Deepak Kesarkar on Ajit Pawar : कोल्हापुरातील हिंसाचार आणि भाजप-शिंदे सेनेतील जाहिरात वादावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना थेट सरकारमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे.

शिर्डी दौऱ्यावर असलेले दीपक केसरकर पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर हिंसाचारावरून अजित पवार यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. ‘अजित पवार यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. त्यांनी चुकीची विधानं करू नयेत. संजय राऊत यांच्यासारख्यांनी बोलणं ठीक आहे. पण अजितदादा बोलतात तेव्हा लोक त्यांना गंभीरपणे घेतात. त्यामुळं सामाजिक ऐक्य राखण्यासाठी ते आमच्यासोबत असतील,’ अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली.

'अजितदादांनी सरकारमध्ये यावं अशी आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. ते आले तर आम्हाला आनंदच होईल. त्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय राजकारणं होतंय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मी स्वत:ही त्या पक्षात होतो, असं केसरकर म्हणाले.

‘अजितदादांच्या कार्यक्षमतेचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला व्हावा, असं मला वाटतं. त्यासाठी त्यांनी एक चांगलं माध्यम निवडलं पाहिजे आणि ते माध्यम मोदी साहेबच आहेत,’ असा दावा केसरकर यांनी केला.

केसरकरांच्या ऑफरवर सुप्रिया सुळेंची भन्नाट प्रतिक्रिया

दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना दिलेल्या ऑफरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ बच्चन हे प्रत्येकालाच आपल्या चित्रपटात हवे असतात. किमान त्यांचा आवाज, लूक तरी आपल्या सिनेमात दिसावा असं सर्वांनाच वाटतं. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर